लग्न म्हणजे... (भाग १)
*लग्न म्हणजे.....(भाग १)*
लग्न माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. अजून लगीन झालं नाही तरी मला आजूबाजूच्या जोडप्यांचे संसार बघू बघू खूप अनुभव आले आहेत. ते म्हणतात ना काही गोष्टी करून बघितल्या पेक्षा दुरून बघितल्यावर सुद्धा माणूस शिकत असतो. लग्न म्हणजे फक्त बायको आणि मुलं असणं आणि मोठा संसार असा अर्थ नसतो. तर नवरा बायको ने एकमेकांच्या प्रत्येक गोष्टी आणि सवयीबद्दल जागरूक राहून प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना समजून घेऊन सांभाळायचं असतं... मला माझे मित्र , मैत्रिणी आणि नातेवाईक तसेच सहकारी नेहमी विचारतात की *लग्न कधी करतो?* माझं एकच उत्तर असते की मी सध्या स्वतः ला लग्नाच्या लायकीचा समजत नाही. कारण लग्न काही पोरखेळ नाहीय! *फक्त एक चांगल्या मनाचा माणूस* म्हणून मी कोणासाठी योग्य ठरत नाही. सोबतच आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्नही महत्वाचा असतो, (जो सुटायला अजून काही दिवस बाकी आहेत). माझ्या मते *लग्न ,बायको , पोरं बाळं* ही माणसाची *गरज नसते*. तर आयुष्य अजून सुंदरतेने जगण्यासाठी असलेल्या माध्यमांपैकी एक असते. *लग्न केलं तर मुलं बाळं केलीच पाहिजे* अशीही गरज नसते . तो त्या दोघांचा निर्णय असतो. पण या समाजाने त्या गोष्टींना *रूढी आणि संस्काराचे लक्षण* म्हणून ओळख दिल्याने कित्येक जीवांना त्यांच्या संसारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. *ज्याचं लग्न जमत नाही त्याच्याकडे हा समाज खूपच विचित्र दृष्टीकोनातून बघतो.* लग्न करण्याची इच्छा असणं आणि लग्नासाठी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या तयार असणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो हे काही लोकांना कळत नाही हे दुर्दैव आहे. वंश पुढे वाढला पाहिजे ह्या कारणास्तव लोकं मुलांना लग्न करण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतात. मुलगा नालायक, व्यसनी, दुष्ट प्रवृत्तीचा जरी असला तरी त्याचं लग्न लावून कित्येक मुलींचं आयुष्य पार उध्वस्त होताना आपण बघितलं आहे. आजूबाजूला अनेक उदाहरणं सापडतील. वय खूप होत आहे म्हणून लग्न करून टाकायचं, मुलींचा दुष्काळ आहे असं सांगून लग्न करून टाकायचं, मोठ्या भावाचं तुझ्या आधी होणार नाही असं इमोशनल करून लग्न करून टाकायचं आणि मुलींना संसारात टाकून द्यायचं. मरणाआधी नातवांना खेळवण्याची इच्छा आहे असे म्हणून लग्नासाठी मुलांना तयार करायचा जणू काही ट्रेण्ड च चालू आहे. लग्न म्हणजे जणू एक फॅशनच झाली आहे !🤔
पैसा ,जॉब, इस्टेट असला तर माणूस चांगला राहत नाही आणि माणूस चांगला असला तर पैसा,जॉब राहत नाही असा हा विरोधाभास बऱ्याच केसेस मध्ये बघायला मिळतो. क्वचितच केसेस मध्ये मुलगा स्वभाव आणि कर्तृत्वाने योग्य दिसतो. शेतीप्रमाणे लग्नाचासुद्धा जुगार झालेला दिसतोय. मला तर खूप टोमणे खायला मिळतात लग्नावर. ते टोमणे मी बरोबर पचवून टाकतो.😆 कारण मी ठरवलंय, स्वतःला लायकीचं बनवल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि वय निघून गेलं किंवा मुलगी जर नाहीच भेटली (तसा इतका उशीर नाही होणार😅तरी) तर आयुष्यभर फक्त आई-वडिलांना आणि भावा बहिणी च्या मुलांना सांभाळण्यासाठी मी तयार राहीन. *लग्नाव्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी या जगात असतातच.* *फॅमिली, बिजनेस तसेच माणुसकी साठीही आयुष्य जगता येतं...* लग्ना वाचून कोणी मरत नाही पण *लग्नामुळे जीवनाला अर्थ मिळतो हे* ही आहे. मी पण लग्न करणार, पण *फक्त मुलं बाळ आणि स्वयंपाक किंवा धुणी-भांडी साठी कोणी व्यक्ती असावी यासाठी नाही,* तर आयुष्यभर माझ्या योग्य-अयोग्य गोष्टींमध्ये मला *सल्ला आणि साथ देणारी व्यक्ती* भेटावी म्हणून...
*लेखक :* *ग.का.शेळके(G.K.SHELKE)*(17/02/2024)
Comments
Post a Comment