म्हाताऱ्याचं दुःखं...
#म्हाताऱ्याचं_दुःख..
- ग.का.शेळके
तरुणपणी मी खूप कामं केली.अंगाला नेहमी काम करत राहण्याची सवय झाली होती.घरी खूप जमीन होती,परंतु काही कारणास्तव वाडवडिलांनी विकून टाकली.मी खूप लहान असतानाच माझं लग्न लावलं गेलं.त्यावेळेस संसार काय असतो हे कुणाला माहीत होतं? पण सुंदर मनाची जोडीदारीण भेटली आणि आयुष्य अजून सुंदर बनलं.बघता बघता दोन मुलं आणि एक सालस मुलगी झाली. त्यांच्यासाठी आयुष्य जगत आलो. दुर्दैवाने पत्नीच्या आयुष्यासाठी तिच्या आजारपणात इलाजासाठी जमीन विकावी लागली.पोरांच्या आईच्या जिवापेक्षा जमीन काही जास्त नाही असं वाटलं.वर्षामागे वर्षे लोटली आणि पोरं जवानीत अली.पण मोठा मुलगा कमी वयातच व्यसनाच्या मागे लागला.वाईट संगतीत राहून शिवीगाळ करणं शिकला.जबाबदारी ची त्याला जाणीव वाटेनाशी झाली.या परिस्थितीत लोकांचं ऐकलं, पोराचं लग्न लावून द्या तरच ते सुधारेल काहीतरी.. भोळ्या भाबड्या आम्ही मायबापानी त्याचं लगीन लावून दिलं.पण तरी त्याची वागणूक बदलत नव्हती.दारू च्या पायी बायोकोलाही तो त्रास देऊ लागला. जिणं मुश्किल करून टाकलं. म्हणून काळजावर दगड ठेवून त्याला बायोकोसह घराबाहेर काढून दिलं... खूप स्वप्न बघितली होती, आपले मुलं चांगले शिकतील,कामाला लागून आपला आधार बनतील,पण ते व्यसनाधीन होऊन गैर वर्तन करू लागले.पोरं खराब निघाले की दुनियावाले मायबापांवरच बोटं उचलतात...त्यांना वळणं लावण्यासाठी त्यांच्या मागे मागे फिरणं कसं शक्य आहे? पोरं बिघडले याचं काही वाटलं नाही पण, त्यांच्या लग्नाच्या बायकांना ते पायातल्या जोड्याप्रमाणे वागवू लागले.तेव्हापासून आम्हाला स्वतःचा खूप राग होता, की आपल्या मुलांच्या आयुष्यात त्या निष्पाप पोरींना आणून आपण किती मोठी चूक केली... आता त्यांनाही यातना सहन कराव्या लागणार...रोज रोज घरात भांडणं व्हायची. मोठा मुलगा तर बिघडलाच होता पण छोट्या मुलालाही शिव्या देण्याची वाईट सवय लागली.बायकोला पायातल्या चपलीसारखी वागणूक देणारे बिघडलेलेच म्हणायचे.आता या वार्धक्यात जगणं अवघड झालं आहे...बायको देवाघरी गेली, तिला तरी बिचारी ला लवकर मुक्ती भेटली... आज यांना दोन,तीन मुलं आहेत.काळ बदलला तसा छोट्या मुलाच्या स्वभावात सकारात्मक बदल झाला याचे समाधान आहे... मोठा दारूमुळे शरीराची नासाडी करून आता घरीच बायकोच्या कमाईवर जगत आहे. दोघं भाऊ एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या घरात राहतात.त्यांच्यात तसं चांगल सुरू आहे याचेही आज समाधान आहे..परंतु ते म्हणतात ना, देव देते आणि कर्म नेते, अशी आता माझी गत झाली आहे. मुलांच्या बालपणात मी नकळतपणे घेतलेल्या काही निर्णयामुळे त्यांच्या बायका काही मला बरं पाहत नाहीत...बरोबरच आहे त्यांचं. जो करतो तो एक दिवस भरतोच.मग भलेही त्याच्याकडून अजाणतेने किंवा मजबुरी ने चूक झाली असेल...नातवंडं जोपर्यंत अजाणती होती तोपर्यंत त्यांनी भरपूर सुख दिलं, आनंद दिला.परंतु आज ,तेही रोज नजरा चुकवून समोरून काहीच न बोलता निघून जातात...माझ्या मुळे आणि माझ्या वाडवडील यांच्या कर्मामुळे आज माझ्या मुलांच्या नशिबात साधी एक एक एक्कर जमीन पण वाट्याला राहिली नाही..या गोष्टींमुळे मनात नेहमी अपराधीपणाची भावना घेऊन मी जगत आहे.बायको होती तोपर्यंत खायला काहीच कमी नव्हती.दोन घास सुखानं तरी गिटायचे..पण आता रोज सुनांचे रागाने हिरमुसलेले ते चेहरे बघून एक घास पण सुखानं खाता येत नाही.. दोघे मुलं वेगळी राहतात. कुणाकडं जेवायला, चहा ला ,अंघोळीला कोणत्या टायमाला जायचं याचं वेळापत्रक ठरलेलं आहे...सुनांचं ठीक आहे, पण पोटची मुलंही आज या बापाचा तितकाच तिटकारा करतात... यापेक्षा एका बापाला कोणती मोठी शिक्षा असेल...सुना समोर बोलून दाखवत नाहीत पण बायांमध्ये बोलत राहतात... आज मला कुणासोबत कसं वागावं कळत नाही...नातवंडं जवळ येऊन बसत नाहीत.त्यांनाही मीच चुकीचा वाटतो.आयुष्याचं असं अवघड वळण बघण्याची वेळ आली की या म्हातारपणात स्वतः चं पोट भरण्यासाठी कामपण केल्या होत नाही.. शरीर दुबळे झालंय, दमा अस्थमा, हार्ट चा आजार झालाय..जगावं असं वाटत नाही, पण आत्महत्या करावीशी पण वाटत नाही..आणि मरण काही लवकर येत नाहीय...सुनांचे ताणें, मुलांच्या तिखट नजरा, नातवंडांचा दुरावा हीच शिक्षा नशिबानं मला सुनावली आहे...पण मला सांगा, फक्त एकाच बाजूने विचार करून कुणाबद्दलही एवढा तिटकारा करणं कितपत योग्य आहे... जमिनी विकण्यामागे काही मजबुरी वा कारण असेलच न...मी लहान असतांना वाडवडिलांनी जमिनीचा व्यवहार केला त्याची शिक्षा मला का...? पत्नीला जगवण्यासाठी जमीन विकली हा खूप मोठा गुन्हा?...मुलांनी चुकीची संगत धरून व्यसनं निवडली, त्यांनी वागणूक अमानवी धरली त्यातही माझीच चूक?.....दिवसभर घर खायला उठतं.. पोरं येऊनजाऊन मोबाईल वाजवत राहतात ,त्याचा कंटाळा येतो.म्हणून दिवसभर परक्या ठिकाणी जाऊन मनाला उभारी देत राहतो..आज ऐकून घेतोय कारण मजबुरी आहे. जगायला अन्न लागतं आणि ते मिळवण्याची धमक आता ह्या म्हाताऱ्या शरीरात राहिली नाही...पित्त रोगांमुळे नेहमी चिडचिड चिडचिड होत राहते.त्यामुळं कुणाला चुकून दोन शब्द बोलीन या धाकाने गप्प एका कोपऱ्यात असतो...आपलं दुःख लपवण्यासाठी चेहऱ्यावर आशेचं हसू ठेवतो...भोग सरता सरत नाहीत, आणि आमच्यासारखे म्हातारे लवकर मरत नाहीत...
(बऱ्याच गोष्टी सत्यकथेवर आधारित आहेत.काही गोष्टी कल्पकतेने लिहिल्या आहेत..)
- ग.का.शेळके.
Comments
Post a Comment