लग्न म्हणजे.....(भाग ३)

 *लग्न म्हणजे.....(भाग ३)* 


  लग्न झाल्यावर बरेच लोकं मुलगा आणि सून यांच्यावर फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी प्रेशर टाकू पाहतात. मला वाटते की हा त्या दोघांचा निर्णय असला पाहिजे. पहिली गोष्ट तर लग्न झाल्यावर निदान दोन तीन वर्षे तरी पती पत्नी ला एकमेकांना अजून चांगल्या रित्या समजून घेण्यासाठी देता आले पाहिजे.जेणेकरून आयुष्याची पुढील वाटचाल करण्यासाठी आवश्यक ते निर्णय ते दोघं मिळून घेऊ शकतील.पण हल्ली ही गोष्ट मुलाचे आई वडील डोक्यात न घेता मरण्याआधी नातू किंवा नात द्या असं करत असतात. हो, काही कुटुंबांतील आईवडील सुशिक्षित आणि खुल्या विचारांचे असतात तिथं ही गोष्ट अपवाद ठरू शकते. *मुलं जन्मास घातलीच पाहिजे* हा विचारच कधी कधी मला विचित्र वाटू लागतो. लग्न यासाठी करतात का? बऱ्याच वेळा मुलगा आर्थिक दृष्ट्या कमजोर असताना देखील फॅमिली वाढवण्याचे निर्णय घेतले जातात. त्याचा परिणाम मी आजूबाजूच्या निरिक्षणातून बघितला आहे. शारीरिक ,आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असल्यावर हा निर्णय कधीही योग्यच ठरेल. पण लोकांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचा मोह आवरत नाही अन् वंश पुढे वाढला पाहिजे म्हणून सुनेला मनस्ताप दिला जातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. लेकरं झाली म्हणजे पती पत्नी ला एकमेकांपेक्षा जास्त लक्ष त्या नवीन निरागस जीवावर द्यावं लागतं.बऱ्याच केसेस मध्ये या कारणांमुळेही विवाहितांमध्ये कधी कधी वाद उद्भवतांना आढळतात. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी फक्त स्वतः ची तयारी बघणं आवश्यक आहे. तिसऱ्या च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कळत नकळतपणे असे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. नाही तरी निदान 2 वर्षे तरी नवीन लग्न झालेल्याना एकमेकांच्या सहवासात घालवता आले पाहिजेत. त्यांचे मानसिक आरोग्य जितके चांगले राहील तितकीच त्या कुटुंबाची भरभराट होत राहील.

    


लग्नाआधी आपण कसे होतो आणि किती चुका केल्या ते विसरून पुढील आयुष्यात तशा चुका किंवा विकृती येऊ नये असं स्वतः ला आपण बनवलं पाहिजे. आर्थिक परिस्थिती रॉयल असो वा नसो, पण स्वभाव मात्र रॉयल असला पाहिजे! व्यसन, बेइमानी, भांडखोरपणा, अती राग, बालिशपणा इत्यादी गोष्टींपासून दूर राहिले तर संसार खूप चांगल्या प्रकारे चालवता येईल. आयुष्य एकदाच भेटते (पुढील जन्म माणसाचा भेटेल की नाही कुणास ठाऊक/ भेटेल की नाही तेही आहे🤔) त्यामुळे आपल्या मुळे आजूबाजूला नेहमी पॉजिटिव वातावरण निर्माण होईल असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. सुदैवाने माझी फॅमिली खूप चांगल्या विचारांची आहे. माझे आई वडील जास्त शिकलेले नाहीत पण त्यांनी आम्हाला नेहमी आमचे स्वतः चे निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देऊन जगणं आमच्या फॅमिली कडून शिकावं.🥰 

    लग्न म्हणजे आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. तो जर नीट जपता आला नाही तर समाजाची यंत्रणा विस्कळीत होते. त्यामुळेच प्रत्येक अविवाहित मुला मुलींनी आतापासूनच लग्न या महत्वाच्या गोष्टीचा अभ्यास करून ठेवला पाहिजे. लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. तरच समाजामध्ये शांती ,सुख आणि समृद्धी कायम राहील.


 *लेखक -* 

 *ग.का.शेळके (G K SHELKE)*

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!