लग्न म्हणजे ....(भाग ४ )
*लग्न म्हणजे ....(भाग ४ )*
समाजात लग्नाला खूप महत्व आहे पण त्या घटकाला प्रत्येक ठिकाणी योग्य तो न्याय मिळतोय का हेही महत्त्वाचे आहे..जरी पूर्वीपेक्षा लग्नाच्या जोडीदाराला शोधण्याच्या प्रक्रियेत थोडी आधुनिकता दिसत असली तरी ग्रामीण भागांमध्ये *काही मुलं-मुली आजही त्यांच्या जोडिदारापासून फारशा सुखी नाहीत.* याचे अनेक कारणे असू शकतात. ज्या निकषांवर लग्नासाठी मुले शोधली जातात त्यांच्या बाबतीत कधी कधी खोटे सांगून किंवा देखावा करून लग्न लावली जातात. *काही वेळा लग्नाआधी* नवरदेव स्वतः ला खूप नम्र आणि मानसिक दृष्ट्या निरोगी तसेच स्त्रियांचा आदर करणारा भासवतो पण लग्न झाल्यावर काही दिवसांतच त्याचा खरा स्वभाव नवरी आणि तिच्या माहेरच्या मंडळींना दिसू लागतो. असच मुलींच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते की मुली आधी स्वतः ला दाखवतात वेगळं आणि असतात वेगळं... आपण दुकानात एखादी वस्तू खरेदी करताना किती बारीक चौकशी आणि निरीक्षण करतो पण हल्ली बऱ्याच सोयरिकी हव्या तशा गांभीर्याने झाल्याचे वाटत नाही. चुकीच्या ठिकाणी सोयरिक झाल्याने कितीतरी जीव बरबाद होताना मी पाहिलंय...अनेकदा सर्वकाही नीट असूनही नियती साथ देत नाही. काही ना काही कारणांमुळे दोघांत वाद निर्माण होऊन *वेगळं होण्याइतपत* वेळ येते. बऱ्याच मुलींची पुढं शिकण्याची आणि स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा असते.
पण घरच्यांच्या दबावाखाली किंवा प्रेमप्रकरणातून त्या लग्नाच्या बंधनात पडतात. मग नवरा आणि सासरचे लोक सपोर्ट करणारे निघाले तर त्या मुलीला ते घर सुखाचे वाटू लागते. पण जर तसा सपोर्ट मिळाला नाही तर मात्र त्यांची आतल्या आत घुसमट सुरू होऊ लागते. आयुष्यभर फक्त चूल आणि मूल करण्यासाठी आपण याच्या सोबत लग्न केलं होतं ?😒 अशी घालमेल सुरू होते. ज्याच्या साठी आपण दूनियेसोबत लढून त्याच्या घरी आलो, त्या नवऱ्याला सुद्धा जर आपल्या स्वप्नांशी, इच्छेशी काहीच पडलेलं नसेल तर .... मग मुली त्या नात्यातून बाहेर निघण्याच्या किंवा स्वतः ला स्वतंत्र अस्तित्व देण्याच्या प्रयत्नात काही न काही करू लागतात. पुरुषांनी हे समजून घ्यायला हवं की आपल्या बायको च्याही काही इच्छा आकांक्षा किंवा स्वाभिमान असतो. तो जर जपला गेला नाही तर त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होण्याची शक्यता असते. आपल्या पत्नीला तिच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पाठींबा देणं ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे. तसेच आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देणं ही पत्नीची भूमिका असते. दोघंही एमेकांच्या विचारांचा आदर करणारे असले तर आयुष्य किती सुंदर होईल. चांगले वाईट गुण प्रत्येकात असतात. कोणीच परफेक्ट नसतो हे आपण समजून घ्यायला हवं. पीच्चर प्रमाणे आपल्याला कोणी हिरो/हिरोईन सारखीच भेटलं पाहिजे अशी अपेक्षाच योग्य नाही. लग्नाआधी फोन वर जितक्या गप्पा हाणता त्यातच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या पाहिजेत मुला मुलींनी.. संसारात येण्याआधीच त्यात उद्भवणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीची चर्चा करून त्यावर काय उपाय करता येतील हेही लग्नाच्या आधीच समजून घेतलं पाहिजे.
*लेखक - ग. का.शेळके (G.K SHELKE)*
Comments
Post a Comment