लग्न म्हणजे.... (भाग ७)

*लग्न म्हणजे.....*
*(भाग ७)*
  
    बेरोजगारी, व्यसन, शिक्षणाचा अभाव, वाढती स्त्री भ्रूणहत्या, मुलींचे उच्च शिक्षण आणि त्यातून झालेली जागृती, कमजोर आर्थिक परिस्थिती, शेतीचा अभाव, छोटे घर, बदनामी चे व्यक्तिमत्व,शारीरिक विदृपता, लग्ना बद्दल पाळलेले गैरसमज, इत्यादी मुलांचे लग्न न जमण्याची कारणं असू शकतात. *आधुनिकतेकडे* झुकलेल्या समाजाची लग्ना बाबत मुलांकडून वाढती अपेक्षा हे सुद्धा बऱ्याच मुलांचं लग्न न जमन्या मागचं कारण आहे. घरी शेतजमीन असावी, नोकरीला असावा, गाडी असावी, शिक्षण असावं, इत्यादी अपेक्षा.  मुलगा निर्व्यसनी आहे का, त्याचा स्वभाव कसा आहे, स्त्रियांचा आदर करतो का, कष्टाळू आहे का, आपल्या मुलीच्या हिशोबाने योग्य राहिल का इत्यादी गोष्टीही बघितल्या गेल्या पाहिजेत. दुर्दैवाने बऱ्याच वेळा मुलाचा स्वभाव आणि ह्या समाजाच्या अपेक्षा मेळ खात नाही... गरीब किंवा सामान्य  घरातील पण स्वभाव, कर्तृत्व आणि चारित्र्याने सुंदर असलेल्या मुलाला आपली मुलगी देण्याचं रिस्क खूपच कमी लोकं घेतात. सुखापेक्षा समाधान महत्वाचं असतं. पैसा कितीही असो ,पण नवराच व्यसनी किंवा फाटक्या चारित्र्याचा निघाला तर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही... बायको कितीही सुंदर असो, पण ती जर आपल्या घरच्यांची मान सन्मान करणारी, आपल्याला समजून घेणारी नसेल, तर त्या सुंदरते ला काहीच अर्थ उरत नाही. आपली सुंदरता वयाच्या एका टप्प्यावर मरून जाते. मात्र आपला स्वभाव आणि सुंदर चारित्र्य नेहमी जिवंत राहते...
     आपला मुलगा जर बेजबाबदार, व्यसनी, चारित्र्यहीन, मोकाट, स्त्रियांचा आदर न करणारा असेल तर अशाच्या घरच्यांनी त्याला मुंजा सोडून द्यावं,पण *आपला वंश पुढं नेण्यासाठी* त्याचं लग्न करून कोणाच्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये... असे कित्येक बरबाद झालेली घरं मी जवळून बघितली आहेत. असे खूप लायक आणि पात्र नवरदेव आहेत.  त्या नालायकांचे लग्न लावून त्या लायक मुलांवर अन्याय होऊ देऊ नये. कारण मुलींची संख्या तुलनेने खूप कमी होत आहे. चांगल्या चांगल्या मुली जर अशा फालतू मुलांना भेटल्या तर चांगल्या मुलांचा लग्नावरचा विश्वास हलायला वेळ लागणार नाही...पैसा, प्रॉपर्टी काही करून मिळवताही येईल पण सुंदर चारित्र्य अन् मन मिळण्यासाठी नशीब लागते. आपला एक चुकीचा निर्णय आपल्या मुलीच्या आयुष्याचे बारा वाजवण्यासाठी समर्थ असतो...समाजात जर प्रतिष्ठा हवी असेल तर आपल्या मुलींना योग्य प्रकारे चौकशी करून चांगल्या मनाच्या मुलांना द्या. ओझं म्हणून मुलींना लवकरात लवकर दुसऱ्याच्या घरी पाठवण्याचा हेकेखोरपणा सोडून द्या. मुली ओझं नसतात, तर त्या खऱ्या अर्थाने घर सांभाळत असतात. स्वयंपाक, धुणी भांडी, अपत्य संगोपन, संस्कार, रीती रिवाज, पुजा पाठ, नोकरी करत त्या सगळं मॅनेज करत असतात. फक्त चूल आणि मूल इतकच त्यांचं आयुष्य मर्यादित ठेवू नका.. म्हणजे ज्या मुलींना पुढं शिकण्याची इच्छा आहे, स्वतः करियर करायचं आहे त्यांना लग्ना नंतरही सपोर्ट देण्याचा प्रयत्न करावा. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या माणसाचं मन जपण्यावर आपलं लक्ष द्या.. आधी कसेही असोत ,पण आता लग्न झाल्यावर जबाबदार बनून होईल तितकं चांगलं वागायचं. व्यसनंच करायची असतील तर लग्न करू नका आणि तरीही लग्न केलंच तर मग मुलं जन्मास घालू नका. कारण तुमच्या कर्माची फळं उद्या तुमची मुलं तुम्हाला देऊ शकतात. आपण जे करतो त्याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो.

 *लेखक -* 
    *ग.का.शेळके (G.K.SHELKE)*

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!